Wednesday, November 14, 2012

जो पर्यंत प्राण आहे.... जब तक है जान

'यश राज फिल्म्स' - YRF, नाम तो याद होगा....(" *** नाम तो याद होगा ".. हा YRF चा अजरामर झालेला डायलॉग कोण विसरू शकेल..), असं जिव्हारी लागण्यासारखं नकळत, अबोलपणे कदाचित बोलून गेले असतील 'यश चोप्रा', असं वाटून जातं काहीसं, त्यांना हा माझा मानाचा मुजरा... 

'जीवेत शरदम शतम' म्हणायचं राहून गेलं, असं काहीसं वाटून गेलं असेल तमाम सिनेमाप्रेमी लोकांना आणि त्यांना ही चुटपूट सदैव बेशक लागून राहील.

पाहूया त्यांची ही 'सतत तेवत राहणारी प्रेमाची मशाल' कोण पुढे घेऊन जाईल ? शेवटी जस आपण म्हणतो, "सचिन तो सचिनच, किंवा लता ती लताच,  तसं यश चोप्रा ते यश चोप्राच". "प्रेम आणि निखळ प्रेम" , हा साधा धागा घेऊन त्याभोवती 'कित्येक' प्रेम-चित्रपट निर्माण करता येतात, गुंफता येतात हे यशजींकडून शिकावं, कुठल्याही निर्मात्या दिग्दर्शकाने. (लोकांना इथे भलतंच वाटेल की मी YRF चा प्रवक्ता आहे की काय.. ;-)..).... असो..

तर मूळ मुद्दा जो चित्रपटाचा आहे, "जो पर्यंत माझ्यात प्राण आहे तो पर्यंत तुझ्यावर प्रेम करीन मी"... -- "जब तक है जान", अशा काहीशा आपण अनेक प्रेमि युगुलांच्या आणा भाका ऐकल्यात, ऐकतो आणि ऐकत राहू, पण किती त्यांवर आजकाल खरे उतरतात हा एक 'सर्वेक्षणाचा विषय' होऊ शकतो.. असो..


"समर आनंद" (शाहरुख खान), नुसती चित्रपटात एन्ट्री घेतली पठ्ठ्याने आणि शिट्ट्याच शिट्ट्या. एवढ्या "मीरा" (कतरिना) आणि "अकीरा"ला (अनुष्का) सुद्धा नाही मिळाल्या हो.. :-(.. कससं झाला मलातरी.... [अपवाद फक्त समर आणि मीराच चुंबनदृश्य सोडलं  तर.. :P..... सल्लू रागावेल हा.. चिडवू नका त्याला]. तर सांगायचा मुद्दा हा की, अजूनही शाहरुखचा फैन वर्ग लयं आहे, हे दिसून आलं. (अजूनही अशासाठी म्हटलं राव कारण कि साहेबांचं वय दिसून येतं कि या चित्रपटात, 'मीरा/अकिरा वर्सेस समर आनंद .. तुम्हीच पहा').. असो..

बॉम्ब डिस्पोसल स्क्वाड.. अम्म्म्मम.. 'बॉम्ब विरोधी पथकात' (बरोबर आहे का भाषांतर ते नंतर सांगा मला... ;-)... ), तेही भारतीय सेनेच्या पथकात काम, ह्या एन्ट्रीने समर सर्वांसमोर सादर केला जातो. बॉम्ब निकामी करण्यात एक्सपर्ट.. आकडा निकामी करण्याचा ९७ आणि ९८ व्याच्या तयारीत. लगेच हॉट गर्ल अकीराची एन्ट्री, डिस्कवरी वाहिनीची प्रतिनिधी. नेमकी तिच्या हातात समरची डायरी पडते, आणि टिपिकल प्रेमाचा फ्ल्याशब्याक [Flashback] सुरु होतो. 'डन डन लंडन' चा मागे नजारा, आणि आपली दुसरी हॉट  गर्ल, मीराची एन्ट्री. पठ्ठ्या समर झाला की हो शिकार, काय म्हणतात ते पहिल्या नजरेतल्या प्रेमाचा.

भारतीय मुलाशी लग्न नं करण्याचा विडा उचलणारी मीरा शेवटी भारतीय समरच्याच प्रेमात पडते. पण इतर टिपिकल चित्रपटांप्रमाणे मी बाबांना कसं सांगू, त्यांनी आई नसताना ('नीतू कपूर'.. ही सुद्धा आहे हो...'ऋषी कपूर'च्या प्रेमाखातर सोडून देते मीराच्या बाबांना, 'अनुपम खेर'ला), मला वाढवलं, मी जे मागितलं ते दिलं आणि आता त्यांनी माझ्याकडे त्या अमुक मुलाशी लग्न कर, असं म्हटल्यावर नाही म्हणू शकत नाही, वगैरे वगैरे.. पण शेवटी एव्हर ग्रीन, समरच्या प्रेमात पडतेच ती. पण दैवाच्या तिच्या नियतीत भलतंच वाढून ठेवलेलं.

आधुनिक गर्ल, आजकालच्या पिढीच प्रतिनिधित्व करणारी मीरा देवाला खूप मानते, आणि आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपली सर्वात आवडती गोष्ट सदैव त्याग करण्याची तयारी दर्शविते (चांगली गोष्ट आहे, जी आजकाल फार दुर्मिळ झाली आहे या स्वार्थी जगात..), आणि इथेच ती नेमकी या चित्रपटात घोळ करून बसते. पुढे समरचा अपघात आणि ती देवाकडे त्याच्या प्राणाची आण भाकते आणि बदल्यात तिची आवडती गोष्ट, समरला, पुन्हा कधी भेटणार नाही, हे मागून बसते... पुढे समर वाचतो, मीरा त्याला तिची शपथ सांगते आणि समर देवाशी भांडून, 'स्वतःच्या प्राणाशी खेळत राहीन, बघूया मला तू कितपत जिवंत ठेवतोस',  असं काहीसं म्हणून भारतात परततो वगैरे वगैरे..

झालं, ही एवढी डायरी वाचून अकिरा प्रेमात पडते हो समरच्या. चित्रपट पुन्हा आता सद्य स्थितीत येतो. पण हीच का ती अकिरा, जी प्रेमाच्या आधी सेक्स करण्याकडे कल आहे असं सांगणारी, बॉयफ्रेंडने सोडायचं दुःख नको म्हणून त्यालाच सोडणारी, आणि आता निखळ प्रेमाच्या गप्पा करणारी... खरंच प्रेम काय काय करू शकतं हो. 

(मधल्या स्टोरीकरिता, इअर मसाल्याकरिता चित्रपट नक्कीच पहा तुम्ही हो... सर्व काही सांगितलं तर मजा तर उरणार नाहीच पण ही लोकं मला आत टाकतील ना हो) :-)... असो..

पुढे समरला पुन्हा अपघात होतो, पुन्हा डोक्याला मार लागतो आणि तो आपली सद्यस्मृती विसरतो आणि दहा वर्ष आधी जाऊन पोहोचतो स्मृतीच्या बाबतीत. पुन्हा मीरा येते त्याच्या आयुष्यात, डन डन लंडनमध्ये. अकीरा तिची समजूत काढते, आणि समर अजूनही तुझ्या निखळ प्रेमात आहे हे सांगते. मीही  त्याच्या प्रेमात पडले, असंही निरागसपणे सांगते ती. पण तो सर्वस्वी तुझाच आहे वगैरे वगैरे आणा भाकते. समरची स्मृती येते, त्याला सद्य परिस्थितीची जाणीव होते, मीराची देवाला दिलेली शपथही आठवते, आणि पठ्ठ्या  भारतात परततो. (मध्ये म्हटल्याप्रमाणे चित्रपट पहा, नाहीतर मला विचाराल, की वरच्याच परिच्छेदात हा पठ्ठ्या भारतात परततो म्हटलंय, तर पुन्हा भारतात कसा परततो हो... अहो हो.. काही खोडसाळ मला विचारतीलही तसं, म्हणून हा आधीच खुलासा करण्याचा अट्टाहास... ). अकिरा जाता जाता मीराला एक  मौलिक सल्ला देऊन जाते, की  'देवाने तुझी परीक्षा घेऊन झालीय आता आणि त्याने फक्त तुझ्याचसाठी त्याला राखून ठेवलाय, जिवंत ठेवलाय', वगैरे.

झालं, मीराला संपूर्ण चित्रपटाच्या शेवटी साक्षात्कार होतो आणि ती पुन्हा भारतात समरकडे प्रेम व्यक्त करण्यासाठी येते....तेव्हा पठ्ठ्याचा बॉम्ब निकामी करण्याचा आकडा १०८ वर जाऊन पोहोचलेला असतो....असो..

साठा उत्तरी कहाणी सुफळ संपूर्ण...

कळावे लोभ असावा 
-- के डी 
+९१-९९२०-५७७-८०२

Times of India  ने या चित्रपटाला २-१/२ आणि rediff ने ३ स्टार दिलेत... तेव्हा चित्रपट पाहणेबल आहे.. निदान शाहरुख, कतरिना आणि अनुश्कासाठी आणि निव्वळ यशराज फिल्म्स आहे म्हणून तरी नक्कीच पहा, मी म्हणेन. Hats off यश चोप्रा..

चित्रपटासाठी ३ स्टार *** माझ्यातर्फे. १/२ स्टार फक्त आमच्या मीरा आणि अकीरासाठी हो....काय समजलात.. बाकी ठरवणारे तुम्ही सुज्ञ आहातच....

Saturday, November 3, 2012

इंगलिश विन्गलिश

इंगलिश विन्गलिश... इंग्रजी विंग्रजी.... काय असतं बुवा हे ?

लहानपणापासून इंग्रजीला घाबरणारे कितीकसे पाहिलेत !

निरनिराळे अनुभव आपल्यालाही अनेकविध अंगांनी आले असतीलच.. बेशक.......शाळा, कोलेज, कार्यालय वगैरे......हो हो आठवा ते अनुभव.... रम्य ते दिवस, अनुभव, मित्रांसोबत केलेली मजा, नीट इंग्रजी न आल्याने कित्येकांची उडणारी भंबेरी आपण पाहिली, खिल्ली उडवली, पोटं दुखेस्तोवर हसलो वगैरे.

इथे तर नेमकं 'आर बाल्की' निर्मितीने तर आपल्या सारख्यांच्या घरचंच उदाहरण घेऊन कदाचित सिनेमा बनवलाय असं वाटतंय... "इंगलिश विन्गलिश".. आणि हो "गौरी शिंदे' च लिखाण आणि दिग्दर्शन कसं नमूद न करून चालेल, शेवटी मराठी बाणा तो...

श्रीमती शशी (श्रीदेवी)... लाडू उत्तम बनवते... व्यवसायच आहे हो तिचा या चित्रपटात... असो. (असा वेगळा उल्लेख का केला ?  ते तुम्हास चित्रपट पाहून कळेलच.... का चित्रपटही पहावयास हवा ना, नुसती समीक्षा वाचून कसा  होईल !!)

चित्रपटाची सकाळच... म्हणजे सुरुवातच सकाळच्या न्याहारीने दाखवलीय, जिथे आजकालची हि शेंबडी पोरं आपल्या आईची खिल्ली उडवताना दाखवलेत ... काय तर म्हणे हिला धड काय ते.... इंग्रजी विंग्रजी येत नाही नीटसं बोलता. आता नाही आलं  तिला 'Jazz Dance' बोलता आणि झ्याझ म्हटला तर काय झालं एवढं त्यात.. त्या शेम्बड्यांना धड मातृभाषा नाही बोलता येत इथ. "तुमको गुस्सा नही आ रही" वगैरे काहीसा फुटकळ बरगळतात :-P.. बरं नवरोबा तोही त्यांना पाठींबा देतो. मस्करीत का होईना, पण कुठेतरी त्याच नवरेपण वरचढ होत असत ना आणि त्यात ह्याला हिचा लाडवाचा व्यवसाय खुपत असतो, डाऊन मार्केट वाटत असतो. (लोक शशीची प्रशंसा करून सुद्धा)

मुलगा शशीचा अतिशय गोंडस, दृष्ट काढण्यासारखा आहे. बहिण त्याची मैत्रिणीसोबत कॅफे कोफी डे मध्ये गेलीय अभ्यासाच्या नावाखाली हेही देखील तो किती निरागसपणे सांगतो हो... पण बहिण त्याची खडूस दाखवलीय यात, सदान कदा आपल्या आईला कमी लेखत असते, इंग्रजी येत नाही म्हणून. आईनं टोकलं  कुठे गेली म्हणून, तर बया सांगते कशी, मैत्रिणीकडे अभ्यासाला होते; घरी का नाही करता येत अस विचारलं तर म्हणे, तू शिकवणार का इंग्रजी  साहित्य???? उदाः - आता मराठी साहित्य आपलं कित्येकांना माहितीये ? पण नाही यांची इंग्रजीची, पाश्चात्यीकरणाची भुरळ ना..... पालक दिनाच्या निमित्ताने बाबा नाही आले म्हणून चिडणारी मुलगी ती, का ? तर आई येणार आता तिच्या त्या कॉन्वेंट शाळेत. अब्रू नुकसान झाल्यासारखं वागणं त्या पोरीचं  (अब्रू - सामाजिक प्रतिष्ठा असा इथे अर्थ आहे).. असो... इथे 'मूल्य शिक्षण' हा विषय नाही सांगायचा मला.. सुज्ञांस इशारा पुरेसा असतो म्हणे....

सिनेमा जसजसा पुढे सरकत जातो तसं शशीच्या बहिणीच्या मुलीच्या लग्नाच तिला आमंत्रण येत अमेरिकेत यायला. मग काय सर्वसामान्य कुटुंबाप्रमाणे ह्यांच खरेदी सत्र सुरु होत. त्यातच mall मध्ये तिच्या नव-याला कार्यालयातील सहकारीण भेटते, लागला आपला गळाभेट घ्यायला. आता तिने यावर टोकलं तर म्हणतो कसा, असच असत ग कार्यालयांच कल्चर. प्रश्न गळाभेटीचा नसून, तसाच तो घरी का नाही वागत आपल्या बायकोशी असा तिचा खडा सवाल.... असो... हा मुद्दा नाहीये चित्रपटाचा.. पण टिपिकल नवरे कसे असतात हे नमूद न करून राहवलं नाही.....

पुढे अमेरिकेच्या विमानात शशीची गाठभेट दस्तुरखुद्द अमिताभ बच्चनशी होते. शशीची उडणारी साहजिक तारांबळ आणि अमिताभ तिला कशी मदत करतो, छान आहे बघायला. (हा प्रसंग नसता तरी चालला असता, पण तरीही चित्रपटाच्या कथेच्या पार्श्वभूमीवर बसतो नेमका). पुढे अमेरिका दर्शन घेत असताना जेव्हा ती कॉफीच्या दुकानात काही खायला म्हणून जाते, तेव्हा तिथे घडणा-या प्रसंगावरून या चित्रपटाल कलाटणी मिळते अस मला वाटत. (काय होतं ते प्रत्यक्ष पहा, म्हणजे झाल)

शशीला पुढे इंग्रजी शिकावस वाटत, एका बसवरील जाहिरात बघून, "चार आठवड्यात इंग्रजी शिका".(अमेरिकेतही अशा शिकवण्या असतात बरं  का !!, झटपट इंग्रजी शिका). बापडी करते आपला प्रयत्न, आणि पोचते तिथे जिथे तिला पोहोचायच असत; कारण मनात कुठेतरी मुलीचे टोमणे सलत असतात, कि केवळ इंग्रजी न येण्यामुळे ती तिची अवहेलना करत असते सतत. तर शशीची हि इंग्रजी शिकवणी बघण्यालायक , दृष्ट काढण्यालायक असते. बिच्चारी रोज न चुकता सर्वांचा डोळा चुकवून शिकवणीला जात असते. पण एके दिवशी तिच्या भाचीला [राधाला..... क्युट आहे हो ;-)] कळतं, पण तिला खूप आनंद होतो, कि आपली मावशी काहीतरी करण्यासाठी धडपडत आहे. नेमका याच शिकवणीत शशीला एक फ्रेंच माणूस भेटतो जो तिला वर उल्लेखलेल्या कॉफी शोप प्रसंगात मदत करतो. मनातून ती त्याला भावलेली असते, पण पठ्ठ्या बोलू शकत नाही. हि पडली हिंदी आणि हा फ्रेंच. (जास्त काही सांगत नाही इथे, पण हि शिकवणी, त्यात घडणारे प्रसंग पाहण्यासारखे आहेत, कस लोक इंग्रजी शिकण्यासाठी धडपडत असतात वगैरे.... बाय द वे यात काही या दोघांच प्रेम प्रकरण नाहीये हा, नाही आपला उगाच गैरसमज होईल तुमचा, म्हणून विशेष उल्लेख करावासा वाटला).

पुढे शशीची मुलं, तिचा नवराही येतात अमेरिकेत लग्नात हजेरी लावायला. नेमक्या लग्नाच्या दिवशी शशीची परीक्षा असते त्या शिकवणीची, कारण तो शेवटचा दिवस असतो ना. अहो होssss ....चार आठवडे संपले कि राव यात. पुढे जसा लग्नाचा प्रसंग येतो आणि जेव्हा शशीची बहिण आपल्या मुली आणि जावयाबद्दल बोलत असते, तेव्हा राधाही आपल्या मावशीला बोलावयास भाग पाडते.  याच प्रसंगात शशीचा नवरा उठला ताडकन पुन्हा, माफ करा माझ्या बायकोला नीटसं इंग्रजी नाही येत बोलता. पण इथेच चित्रपटात सिक्सर लागतो आणि अशी काही ती इंग्रजी बोलते, मग ते तुटक का होईना पण बोलते ना हो खरी....नवरा तिचा अन मुलगी गुमान मान खाली घालून खिन्न होतात आणि आत्ता पर्यंत घडलेल्या सा-या प्रसंगाची लाज वाटायला लागते मग त्यांना.

झालं कि... चित्रपट संपला राव... या लग्नाच्या वेळी राधा आपली.....:-)..... न चुकता शशीच्या शिक्षकांना आणि तिच्या त्या शिकवणीतील खास दोस्तांना आमंत्रण द्यायला विसरत नाही हो, आणि शशीचा भाषण ऐकून सरांचे डोळेही पाणावतात..

चला साठा उत्तरीची कहाणी, सुफळ संपूर्ण झाली..

कळावे लोभ असावा,

आपला विनम्र
-- के डी

चित्रपटासाठी ४ स्टार **** माझ्यातर्फे..