Wednesday, November 14, 2012

जो पर्यंत प्राण आहे.... जब तक है जान

'यश राज फिल्म्स' - YRF, नाम तो याद होगा....(" *** नाम तो याद होगा ".. हा YRF चा अजरामर झालेला डायलॉग कोण विसरू शकेल..), असं जिव्हारी लागण्यासारखं नकळत, अबोलपणे कदाचित बोलून गेले असतील 'यश चोप्रा', असं वाटून जातं काहीसं, त्यांना हा माझा मानाचा मुजरा... 

'जीवेत शरदम शतम' म्हणायचं राहून गेलं, असं काहीसं वाटून गेलं असेल तमाम सिनेमाप्रेमी लोकांना आणि त्यांना ही चुटपूट सदैव बेशक लागून राहील.

पाहूया त्यांची ही 'सतत तेवत राहणारी प्रेमाची मशाल' कोण पुढे घेऊन जाईल ? शेवटी जस आपण म्हणतो, "सचिन तो सचिनच, किंवा लता ती लताच,  तसं यश चोप्रा ते यश चोप्राच". "प्रेम आणि निखळ प्रेम" , हा साधा धागा घेऊन त्याभोवती 'कित्येक' प्रेम-चित्रपट निर्माण करता येतात, गुंफता येतात हे यशजींकडून शिकावं, कुठल्याही निर्मात्या दिग्दर्शकाने. (लोकांना इथे भलतंच वाटेल की मी YRF चा प्रवक्ता आहे की काय.. ;-)..).... असो..

तर मूळ मुद्दा जो चित्रपटाचा आहे, "जो पर्यंत माझ्यात प्राण आहे तो पर्यंत तुझ्यावर प्रेम करीन मी"... -- "जब तक है जान", अशा काहीशा आपण अनेक प्रेमि युगुलांच्या आणा भाका ऐकल्यात, ऐकतो आणि ऐकत राहू, पण किती त्यांवर आजकाल खरे उतरतात हा एक 'सर्वेक्षणाचा विषय' होऊ शकतो.. असो..


"समर आनंद" (शाहरुख खान), नुसती चित्रपटात एन्ट्री घेतली पठ्ठ्याने आणि शिट्ट्याच शिट्ट्या. एवढ्या "मीरा" (कतरिना) आणि "अकीरा"ला (अनुष्का) सुद्धा नाही मिळाल्या हो.. :-(.. कससं झाला मलातरी.... [अपवाद फक्त समर आणि मीराच चुंबनदृश्य सोडलं  तर.. :P..... सल्लू रागावेल हा.. चिडवू नका त्याला]. तर सांगायचा मुद्दा हा की, अजूनही शाहरुखचा फैन वर्ग लयं आहे, हे दिसून आलं. (अजूनही अशासाठी म्हटलं राव कारण कि साहेबांचं वय दिसून येतं कि या चित्रपटात, 'मीरा/अकिरा वर्सेस समर आनंद .. तुम्हीच पहा').. असो..

बॉम्ब डिस्पोसल स्क्वाड.. अम्म्म्मम.. 'बॉम्ब विरोधी पथकात' (बरोबर आहे का भाषांतर ते नंतर सांगा मला... ;-)... ), तेही भारतीय सेनेच्या पथकात काम, ह्या एन्ट्रीने समर सर्वांसमोर सादर केला जातो. बॉम्ब निकामी करण्यात एक्सपर्ट.. आकडा निकामी करण्याचा ९७ आणि ९८ व्याच्या तयारीत. लगेच हॉट गर्ल अकीराची एन्ट्री, डिस्कवरी वाहिनीची प्रतिनिधी. नेमकी तिच्या हातात समरची डायरी पडते, आणि टिपिकल प्रेमाचा फ्ल्याशब्याक [Flashback] सुरु होतो. 'डन डन लंडन' चा मागे नजारा, आणि आपली दुसरी हॉट  गर्ल, मीराची एन्ट्री. पठ्ठ्या समर झाला की हो शिकार, काय म्हणतात ते पहिल्या नजरेतल्या प्रेमाचा.

भारतीय मुलाशी लग्न नं करण्याचा विडा उचलणारी मीरा शेवटी भारतीय समरच्याच प्रेमात पडते. पण इतर टिपिकल चित्रपटांप्रमाणे मी बाबांना कसं सांगू, त्यांनी आई नसताना ('नीतू कपूर'.. ही सुद्धा आहे हो...'ऋषी कपूर'च्या प्रेमाखातर सोडून देते मीराच्या बाबांना, 'अनुपम खेर'ला), मला वाढवलं, मी जे मागितलं ते दिलं आणि आता त्यांनी माझ्याकडे त्या अमुक मुलाशी लग्न कर, असं म्हटल्यावर नाही म्हणू शकत नाही, वगैरे वगैरे.. पण शेवटी एव्हर ग्रीन, समरच्या प्रेमात पडतेच ती. पण दैवाच्या तिच्या नियतीत भलतंच वाढून ठेवलेलं.

आधुनिक गर्ल, आजकालच्या पिढीच प्रतिनिधित्व करणारी मीरा देवाला खूप मानते, आणि आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपली सर्वात आवडती गोष्ट सदैव त्याग करण्याची तयारी दर्शविते (चांगली गोष्ट आहे, जी आजकाल फार दुर्मिळ झाली आहे या स्वार्थी जगात..), आणि इथेच ती नेमकी या चित्रपटात घोळ करून बसते. पुढे समरचा अपघात आणि ती देवाकडे त्याच्या प्राणाची आण भाकते आणि बदल्यात तिची आवडती गोष्ट, समरला, पुन्हा कधी भेटणार नाही, हे मागून बसते... पुढे समर वाचतो, मीरा त्याला तिची शपथ सांगते आणि समर देवाशी भांडून, 'स्वतःच्या प्राणाशी खेळत राहीन, बघूया मला तू कितपत जिवंत ठेवतोस',  असं काहीसं म्हणून भारतात परततो वगैरे वगैरे..

झालं, ही एवढी डायरी वाचून अकिरा प्रेमात पडते हो समरच्या. चित्रपट पुन्हा आता सद्य स्थितीत येतो. पण हीच का ती अकिरा, जी प्रेमाच्या आधी सेक्स करण्याकडे कल आहे असं सांगणारी, बॉयफ्रेंडने सोडायचं दुःख नको म्हणून त्यालाच सोडणारी, आणि आता निखळ प्रेमाच्या गप्पा करणारी... खरंच प्रेम काय काय करू शकतं हो. 

(मधल्या स्टोरीकरिता, इअर मसाल्याकरिता चित्रपट नक्कीच पहा तुम्ही हो... सर्व काही सांगितलं तर मजा तर उरणार नाहीच पण ही लोकं मला आत टाकतील ना हो) :-)... असो..

पुढे समरला पुन्हा अपघात होतो, पुन्हा डोक्याला मार लागतो आणि तो आपली सद्यस्मृती विसरतो आणि दहा वर्ष आधी जाऊन पोहोचतो स्मृतीच्या बाबतीत. पुन्हा मीरा येते त्याच्या आयुष्यात, डन डन लंडनमध्ये. अकीरा तिची समजूत काढते, आणि समर अजूनही तुझ्या निखळ प्रेमात आहे हे सांगते. मीही  त्याच्या प्रेमात पडले, असंही निरागसपणे सांगते ती. पण तो सर्वस्वी तुझाच आहे वगैरे वगैरे आणा भाकते. समरची स्मृती येते, त्याला सद्य परिस्थितीची जाणीव होते, मीराची देवाला दिलेली शपथही आठवते, आणि पठ्ठ्या  भारतात परततो. (मध्ये म्हटल्याप्रमाणे चित्रपट पहा, नाहीतर मला विचाराल, की वरच्याच परिच्छेदात हा पठ्ठ्या भारतात परततो म्हटलंय, तर पुन्हा भारतात कसा परततो हो... अहो हो.. काही खोडसाळ मला विचारतीलही तसं, म्हणून हा आधीच खुलासा करण्याचा अट्टाहास... ). अकिरा जाता जाता मीराला एक  मौलिक सल्ला देऊन जाते, की  'देवाने तुझी परीक्षा घेऊन झालीय आता आणि त्याने फक्त तुझ्याचसाठी त्याला राखून ठेवलाय, जिवंत ठेवलाय', वगैरे.

झालं, मीराला संपूर्ण चित्रपटाच्या शेवटी साक्षात्कार होतो आणि ती पुन्हा भारतात समरकडे प्रेम व्यक्त करण्यासाठी येते....तेव्हा पठ्ठ्याचा बॉम्ब निकामी करण्याचा आकडा १०८ वर जाऊन पोहोचलेला असतो....असो..

साठा उत्तरी कहाणी सुफळ संपूर्ण...

कळावे लोभ असावा 
-- के डी 
+९१-९९२०-५७७-८०२

Times of India  ने या चित्रपटाला २-१/२ आणि rediff ने ३ स्टार दिलेत... तेव्हा चित्रपट पाहणेबल आहे.. निदान शाहरुख, कतरिना आणि अनुश्कासाठी आणि निव्वळ यशराज फिल्म्स आहे म्हणून तरी नक्कीच पहा, मी म्हणेन. Hats off यश चोप्रा..

चित्रपटासाठी ३ स्टार *** माझ्यातर्फे. १/२ स्टार फक्त आमच्या मीरा आणि अकीरासाठी हो....काय समजलात.. बाकी ठरवणारे तुम्ही सुज्ञ आहातच....

Saturday, November 3, 2012

इंगलिश विन्गलिश

इंगलिश विन्गलिश... इंग्रजी विंग्रजी.... काय असतं बुवा हे ?

लहानपणापासून इंग्रजीला घाबरणारे कितीकसे पाहिलेत !

निरनिराळे अनुभव आपल्यालाही अनेकविध अंगांनी आले असतीलच.. बेशक.......शाळा, कोलेज, कार्यालय वगैरे......हो हो आठवा ते अनुभव.... रम्य ते दिवस, अनुभव, मित्रांसोबत केलेली मजा, नीट इंग्रजी न आल्याने कित्येकांची उडणारी भंबेरी आपण पाहिली, खिल्ली उडवली, पोटं दुखेस्तोवर हसलो वगैरे.

इथे तर नेमकं 'आर बाल्की' निर्मितीने तर आपल्या सारख्यांच्या घरचंच उदाहरण घेऊन कदाचित सिनेमा बनवलाय असं वाटतंय... "इंगलिश विन्गलिश".. आणि हो "गौरी शिंदे' च लिखाण आणि दिग्दर्शन कसं नमूद न करून चालेल, शेवटी मराठी बाणा तो...

श्रीमती शशी (श्रीदेवी)... लाडू उत्तम बनवते... व्यवसायच आहे हो तिचा या चित्रपटात... असो. (असा वेगळा उल्लेख का केला ?  ते तुम्हास चित्रपट पाहून कळेलच.... का चित्रपटही पहावयास हवा ना, नुसती समीक्षा वाचून कसा  होईल !!)

चित्रपटाची सकाळच... म्हणजे सुरुवातच सकाळच्या न्याहारीने दाखवलीय, जिथे आजकालची हि शेंबडी पोरं आपल्या आईची खिल्ली उडवताना दाखवलेत ... काय तर म्हणे हिला धड काय ते.... इंग्रजी विंग्रजी येत नाही नीटसं बोलता. आता नाही आलं  तिला 'Jazz Dance' बोलता आणि झ्याझ म्हटला तर काय झालं एवढं त्यात.. त्या शेम्बड्यांना धड मातृभाषा नाही बोलता येत इथ. "तुमको गुस्सा नही आ रही" वगैरे काहीसा फुटकळ बरगळतात :-P.. बरं नवरोबा तोही त्यांना पाठींबा देतो. मस्करीत का होईना, पण कुठेतरी त्याच नवरेपण वरचढ होत असत ना आणि त्यात ह्याला हिचा लाडवाचा व्यवसाय खुपत असतो, डाऊन मार्केट वाटत असतो. (लोक शशीची प्रशंसा करून सुद्धा)

मुलगा शशीचा अतिशय गोंडस, दृष्ट काढण्यासारखा आहे. बहिण त्याची मैत्रिणीसोबत कॅफे कोफी डे मध्ये गेलीय अभ्यासाच्या नावाखाली हेही देखील तो किती निरागसपणे सांगतो हो... पण बहिण त्याची खडूस दाखवलीय यात, सदान कदा आपल्या आईला कमी लेखत असते, इंग्रजी येत नाही म्हणून. आईनं टोकलं  कुठे गेली म्हणून, तर बया सांगते कशी, मैत्रिणीकडे अभ्यासाला होते; घरी का नाही करता येत अस विचारलं तर म्हणे, तू शिकवणार का इंग्रजी  साहित्य???? उदाः - आता मराठी साहित्य आपलं कित्येकांना माहितीये ? पण नाही यांची इंग्रजीची, पाश्चात्यीकरणाची भुरळ ना..... पालक दिनाच्या निमित्ताने बाबा नाही आले म्हणून चिडणारी मुलगी ती, का ? तर आई येणार आता तिच्या त्या कॉन्वेंट शाळेत. अब्रू नुकसान झाल्यासारखं वागणं त्या पोरीचं  (अब्रू - सामाजिक प्रतिष्ठा असा इथे अर्थ आहे).. असो... इथे 'मूल्य शिक्षण' हा विषय नाही सांगायचा मला.. सुज्ञांस इशारा पुरेसा असतो म्हणे....

सिनेमा जसजसा पुढे सरकत जातो तसं शशीच्या बहिणीच्या मुलीच्या लग्नाच तिला आमंत्रण येत अमेरिकेत यायला. मग काय सर्वसामान्य कुटुंबाप्रमाणे ह्यांच खरेदी सत्र सुरु होत. त्यातच mall मध्ये तिच्या नव-याला कार्यालयातील सहकारीण भेटते, लागला आपला गळाभेट घ्यायला. आता तिने यावर टोकलं तर म्हणतो कसा, असच असत ग कार्यालयांच कल्चर. प्रश्न गळाभेटीचा नसून, तसाच तो घरी का नाही वागत आपल्या बायकोशी असा तिचा खडा सवाल.... असो... हा मुद्दा नाहीये चित्रपटाचा.. पण टिपिकल नवरे कसे असतात हे नमूद न करून राहवलं नाही.....

पुढे अमेरिकेच्या विमानात शशीची गाठभेट दस्तुरखुद्द अमिताभ बच्चनशी होते. शशीची उडणारी साहजिक तारांबळ आणि अमिताभ तिला कशी मदत करतो, छान आहे बघायला. (हा प्रसंग नसता तरी चालला असता, पण तरीही चित्रपटाच्या कथेच्या पार्श्वभूमीवर बसतो नेमका). पुढे अमेरिका दर्शन घेत असताना जेव्हा ती कॉफीच्या दुकानात काही खायला म्हणून जाते, तेव्हा तिथे घडणा-या प्रसंगावरून या चित्रपटाल कलाटणी मिळते अस मला वाटत. (काय होतं ते प्रत्यक्ष पहा, म्हणजे झाल)

शशीला पुढे इंग्रजी शिकावस वाटत, एका बसवरील जाहिरात बघून, "चार आठवड्यात इंग्रजी शिका".(अमेरिकेतही अशा शिकवण्या असतात बरं  का !!, झटपट इंग्रजी शिका). बापडी करते आपला प्रयत्न, आणि पोचते तिथे जिथे तिला पोहोचायच असत; कारण मनात कुठेतरी मुलीचे टोमणे सलत असतात, कि केवळ इंग्रजी न येण्यामुळे ती तिची अवहेलना करत असते सतत. तर शशीची हि इंग्रजी शिकवणी बघण्यालायक , दृष्ट काढण्यालायक असते. बिच्चारी रोज न चुकता सर्वांचा डोळा चुकवून शिकवणीला जात असते. पण एके दिवशी तिच्या भाचीला [राधाला..... क्युट आहे हो ;-)] कळतं, पण तिला खूप आनंद होतो, कि आपली मावशी काहीतरी करण्यासाठी धडपडत आहे. नेमका याच शिकवणीत शशीला एक फ्रेंच माणूस भेटतो जो तिला वर उल्लेखलेल्या कॉफी शोप प्रसंगात मदत करतो. मनातून ती त्याला भावलेली असते, पण पठ्ठ्या बोलू शकत नाही. हि पडली हिंदी आणि हा फ्रेंच. (जास्त काही सांगत नाही इथे, पण हि शिकवणी, त्यात घडणारे प्रसंग पाहण्यासारखे आहेत, कस लोक इंग्रजी शिकण्यासाठी धडपडत असतात वगैरे.... बाय द वे यात काही या दोघांच प्रेम प्रकरण नाहीये हा, नाही आपला उगाच गैरसमज होईल तुमचा, म्हणून विशेष उल्लेख करावासा वाटला).

पुढे शशीची मुलं, तिचा नवराही येतात अमेरिकेत लग्नात हजेरी लावायला. नेमक्या लग्नाच्या दिवशी शशीची परीक्षा असते त्या शिकवणीची, कारण तो शेवटचा दिवस असतो ना. अहो होssss ....चार आठवडे संपले कि राव यात. पुढे जसा लग्नाचा प्रसंग येतो आणि जेव्हा शशीची बहिण आपल्या मुली आणि जावयाबद्दल बोलत असते, तेव्हा राधाही आपल्या मावशीला बोलावयास भाग पाडते.  याच प्रसंगात शशीचा नवरा उठला ताडकन पुन्हा, माफ करा माझ्या बायकोला नीटसं इंग्रजी नाही येत बोलता. पण इथेच चित्रपटात सिक्सर लागतो आणि अशी काही ती इंग्रजी बोलते, मग ते तुटक का होईना पण बोलते ना हो खरी....नवरा तिचा अन मुलगी गुमान मान खाली घालून खिन्न होतात आणि आत्ता पर्यंत घडलेल्या सा-या प्रसंगाची लाज वाटायला लागते मग त्यांना.

झालं कि... चित्रपट संपला राव... या लग्नाच्या वेळी राधा आपली.....:-)..... न चुकता शशीच्या शिक्षकांना आणि तिच्या त्या शिकवणीतील खास दोस्तांना आमंत्रण द्यायला विसरत नाही हो, आणि शशीचा भाषण ऐकून सरांचे डोळेही पाणावतात..

चला साठा उत्तरीची कहाणी, सुफळ संपूर्ण झाली..

कळावे लोभ असावा,

आपला विनम्र
-- के डी

चित्रपटासाठी ४ स्टार **** माझ्यातर्फे..

Sunday, October 28, 2012

अरे माझ्या देवा... Oh My God..

ओह माय गॉड.. अरे देवा ... असे आपण कितीतरी वेळा, कितीतरी ठिकाणी, कितीतरी गोष्टीत सतत वापरत असतो.

आता या मागील किंतु, हेतू, परंतु हा विविधांगी, माणसानुरूप, कालानुरूप बदलत असतो, हा भाग निराळा. अमुक काही झालं , कि हे देवा, अस्सं झालंच कसं? काय करणार देवाची करणी.. याच देवाच्या करणीवर आक्षेप घेणारा असा अभिनय मांडलाय 'परेश रावल' यांनी वरील "ओह माय गॉड" या चित्रपटात.

उत्तम सादरीकरण, दिग्दर्शन, सर्वांचा आपापल्या वाटेला अभिनय. पण मूळ खांब म्हणजे परेश रावल. देवाची भूमिका साकारलीय दस्तुरखुद्द 'अक्की" म्हणजे आपला अक्षय कुमार याने.

तर हि कथा एक हिंदी नाटक " किशन वि. कन्हैया" आणि एक  इंराजी चित्रपट "The man who saved God" यावर आधारित आहे.

'कानजी लालजी मेहता' (परेश रावल) हा पक्का व्यापारी दाखवलाय. मुळात देवाच्या मूर्ती विकण्याचा 'धंदा'. आता धंदा म्हटला कि होत्याचं नव्हतं करून सांगायचं असतंच कि नाहीतर यांचा धंदा होणार कसा ? नाही का.  रु. २५० ची मूर्ती हा पट्ट्या रु. १०,००० मध्ये गुंडाळतो ती कशी तर कुठल्याश्या धार्मिक स्थळाच्या उत्खननात सापडली म्हणे. काय नफा आहे हो याचा, तब्बल ३९००% नफा, अबब. असो हा मुद्दा मुळात इथे नाहीये. जरा आपलं आजच्या पिढीला असल्या गणिती रुपात आकडे मांडले कि बरं वाटतं म्हणून, असो.

कथानकाच्या सुरुवातीलाच कानजीच्या व्यापारी वृत्तीचा प्रत्यय येतो, गंगाजालाच्या बाटलीत हा पट्ट्या बेसिनच्या नळाचा पाणी टाकून सरळ धोपट विकतो (नफा, का तर सरळ आहे गंगेकाठी सारखा जायला नको ना. आता हे काही चित्रपटात सांगितलं नाही, पण आपण सुज्ञ आहात सर्व जाणू शकता, वेगळं सांगावयास नको, एवढंच). पुढे जेव्हा एका इसमाच्या आईची शेवटची इच्छा म्हणून तिच्या भजनी मंडळाला तो इसम धार्मिक स्थानाच्या दर्शनासाठी घेऊन जातो तेव्हा आपले कानजीभाई जातात कि सोबत आपल्या कुटुंबाबरोबर. का ते सांगा पाहू...... अहो मूर्ती विकण्याचा धंदा आहे त्यांचा, सांगितला नाही का तुम्हाला, त्याच साठी तो तिथे गेला आणि वर सांगितल्याप्रमाणे रु. २५० च्या मूर्ती विकत घेऊन आला, आणि त्यातही साईबाबांच्या ४ मुर्त्या फुकटात घेऊन आलाच, का तर एवढ्या खरेदीवर डिसकाउंट नको का ? आणि हो साईबाबांची आजकाल म्हणे भारी चालती आहे बाजारात. बाकी नफा कसा कमावतो त्यांवर हे तुम्ही वर दिलेल्या आकड्यांवरून ओळखलं असेलच, पुन्हा सांगावयास नको.

प्रथम दर्शनी 'नास्तिक' भासणारा कानजी, नंतर जसजसं चित्रपटाच कथानक पुढे पुढे सरकत जात, तसतसं त्याचे सरळ धोपट विचार पटत जातात.

पण आजकालची पिढी वाहवत चालली आहे, देवाधर्माच्या नावाखाली. (उदा: गणपती दुध पितो, कृष्ण, शंकर दुध पितो असा ऐकलं कि लागले मागे धावायला. कोट्यावधी लिटरच दुध गटारात वाहून जात. 'नशीब आमचं ते गटारात जातं', नाहीतर जसे नारळ देवळाबाहेर पुन्हा विक्रीसाठी येतात, तसं दुध नाही पुन्हा विकत यात आला. पण म्हणून काय मूळ मुद्दा खोडून काढता येत नाही. नाश हा नाशच.)

कथानक पुढे सरकताना, गोविंदाचा उत्सव येतो आणि गो गो गोविंदा....गाणं येत (नाचावसं वाटतं कि नाहीं त्या तालावर, असो सुंदर संगीत आहे या गाण्याचा आणि सोनाक्षी सिंघ चा आयटम डान्स, तोही दस्तुरखुद्द प्रभुदेवा बरोबर). आता हे गाणं नसतं तर चाललं असतं असा वाटतंय तोच कथा पुढे सुंदर वळण घेते. कानजीभाई सरळ माईक हातात घेऊन सर्व भक्तांना हाकलतो, का तर त्याच्या मुलाची परीक्षा तोंडावर असताना तो मटकी फोडायला जातो म्हणून. मूळ मुद्दा हा नाहीच आहे मुळी या कथेचा, कथा इथून वळण घेते कारण. तिथे कुणी स्वामी आलेला असतो आणि गर्दी जमा झालेली असते दहीहंडी पाहण्यासाठी आणि याचा मुलगाही मटकी फोडायला. कानाजीची सटकते आणि सर्वांना हा पट्ट्या सांगतो माईकवरून कि कृष्ण दुध आणि लोणी खातोय आज तुम्हा सर्वांची गर्दी, भक्ती पाहून. (वर तुम्ही वाचलेला असेलच, ती इथे अनुभवायला मिळते, वाहवत चाललेली भक्ती). या प्रसंगावरून स्वामी भडकतो आणि त्याला सांगतो देव तुला स्वतः दंड करेल या कृत्त्यावरून. आता कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक क्षण म्हणतात तसं, भूकंप होतो आणि नेमका बाजारातील एकाच दुकान पडतं, कोणाच असेल हो ते, एनी गेसेस ? कांजीभाईच. आता यावरून हे सिद्ध होत नाही कि तो स्वामी धुतल्या तांदळाचा आहे ते. तो एक निराळा विषय आहे जो पुढे कथेत अनायासे येतोय.

झालं, नेमकं एकट्या कान्जीच दुकान उध्वस्थ होतं . झालं देवाधर्माच करणारी माणसे म्हणतील कि देवाच्या विरुद्ध बोलत असतो म्हणून हे झालं. एवढा भूकंप झाला आणि नेमका एक दुकान पडावं तेही या कांजीचाच का ?, आता हे जरी खरं असलं कि तो देव जेव्हा शिक्षा करतो तेव्हा आवाजही होत नाही, पण हे त्या कांजीला काळात नाही. जातो लेक आपलं विमा वाल्यांकडे नुकसान भरपाई मागायला, आणि ते नेहमीप्रमाणे कायद्यावर बोट दाखवून भरपाई नाकारतात. कारण काय तर विमा हा देवाच्या लीलांवर म्हणजे भूकंप, त्सुनामी वगैरे गोष्टींवर लागू होत नाही. हे पाहून मनातून उध्वस्थ झालेला कांजी सरळ त्या देवावर 'दावा' ठोकतो नुकसान भरपायीचा.

इथे खरी कहाणी वळण घ्यायला सुरुवात होते. वकील शोधून शोधून दमतो बिचारा कांजी, आणि शेवटी एक वकील (ओम पुरी) तयार होतो दावा ठोकायला देवावर. आणि नंतर इथे एन्ट्री होते कन्हैयाची, कृष्ण वासुदेव यादव, आपला अक्की, 'अक्षय कुमार'. पुढे कथा सरकताना कशी मजा येते ते प्रत्यक्षच पाहण्यातच आणि अनुभवण्यात मजा आहे. जेव्हा तरतऱ्हेचे, निरनिराळे तात्विक विचार, जे तुम्हा आम्हा सर्व सामान्यांना पटतील असे मांडून कांजी आपला मोर्चा देवस्थानातल्या अवैध पैशाकडे वळवतो. आता देव नुकसान भरपाई करणार म्हणजेच हि देवस्थाने, कारण खरं देव कोणी पाहिलेला नाही म्हणून.

आता देवाने सांगितला नाहीं कि मला येऊन पैसा, सोनं-नाणं वहा, चादर चढवा. आता जो सर्व या सृष्टीला जगवतो, त्याला तुम्ही आम्ही पामर काय देणार ? पण हेच या समाजाला कळत नाही आणि देवाधर्माच्या नावाखाली चालणा-या  स्तोमाला नकळतपणे पाठींबा देतात, हे असं करून. हेच जर आपण एखाद्या गरिबाला चादर दिलीत थंडीत, त्यांना खाऊ पिऊ घातलं, किंवा कोणा सज्जनाला पैशांची गरज असताना मदत केली तर तोच देव प्रसन्न होईल आणि त्याच्या दरबारात आपलं स्थान नितळ होत जाईल, हे त्रिवार सत्य आहे. पण हे या लोकांना समजत नाही.

कथा पुढे सरकताना कसा पैशांचा बाजार मांडलेला आहे आजकाल सर्वत्र मठांच्या नावाखाली, ते प्रदर्शनास येत या चित्रपटात. यात मिधून चक्रवर्ती  (एक मठाधीश), महेश मांजरेकर (मिथुनचा आणि इतर माथाधीशांचा वकील,  ज्यांवर कान्जीने दावा ठोकलेला असतो) यांचीही सुंदर महत्वाची भूमिका आहे आणि त्यांनी त्यांच्या भूमिका सुंदर वठवल्याहि. पुढे पुढे कान्जीचे तात्विक विचार तो मांडत असताना न्यायाधीशहि प्रभावित होतो (जेव्हा आधी हा खटला दाखल होईल कि नाहीं याची शंका होती, का तर कारण देवावर दावा असूच शकत नाहीं म्हणून), तो न्यायाधीशही हा खटला स्वीकारून पुढे पुढे कान्जीच्या विचारांवर फिदा झालेला वाटतो. पुढे कांजी याच विचारात फसतो, वकील शाब्दिक सकामाकीत पकडतात आणि एका वर्मावर बोट ठेवतात आणि त्यावर अक्षय कुमार कसा कांजीला नकळत गीता, बायबल कुराण वाचायला लावून मदत करतो आणि यातून बाहेत काढतो हे बघण्यासारखं आहे. पण सरतेशेवटी हेच मठाधीश कुटील कारस्थान रचतात आणि आपली डाळ शिजणार नाहीं हे ओळखून कान्जीची आणि त्यासोबत साधारण अन्य 2०० जणांची नुकसान भरपाई द्यायला तयार होतात, तीही तब्बल ४००-५०० कोटी. (अरे हो, हे अनावधानाने सांगायचं राहीलच कि, कि कान्जीसारख्या असंख्य लोकांच्या केसेस विमा कंपन्याकडून नाकारल्या गेल्या आहेत "'Act of God',या नावाखाली, ज्या हा कांजी स्वतःच्या खाताल्यासोबत लढायला तयार होतो त्या गरिबांची अवस्था, केविलवाणी अशा पाहून).

(या खटल्यादरम्यान कांजीला अर्धांगवायूचा झटका येतो)

मूळ हेतू या मठाधीशांचा तुम्हाला इथे कळला तर हादरून जाल तुम्ही ! अहो हे साले, त्या कान्जीलाच देव करतात, दरम्यानच्या महिन्यात, जेव्हा कांजी इस्पितळात असतो. कसं ? तर त्यांचं गणित काय तर या कान्जीच स्तोम माजवून हे ४०० कोटी एका वर्षांत वसूल कसे करायचे हे त्यांना उमगून आहे म्हणून. शेवटी त्या कृष्णदेवाला कान्जीची दया येते आणि तो त्या कांजीला इस्पितळात जाऊन साक्षात्कार घडवतो देवत्वाचा. या देवाला कान्जीचे प्रात्यक्षिक विचार पटतात, पण त्याच्या 'नास्तिक असण्यामुळे त्याला अर्धांगवायू होतो' हेही सांगायला तो विसरत नाहीं.  या दरम्यानच्या कान्जीच्या देवत्वाच्या घटना तो कांजीला एका पडद्यावर दर्शन घडवतो आणि कांजीवर यास समूळ उपटून टाकण्यासाठी प्रोत्साहित करतो. शेवटी काय करायचं ते त्याने कांजीवर सोडलेला असतं.

अर्थात कांजी त्याच्या भुमिकेवर ठाम असतो आणि तो ते स्वतःचा माजलेला स्तोम मोडीत काढतो.  मुर्तीपुजेत अडकून जाऊ नये, आणि त्या देवाला, त्याच्या देवत्वाला आपल्या मनातून, माणुसकीतून साकारकरा,  हा सरळ धोपट संदेश  कांजीभाई मांडतो. आणि हे आजकालच्या शिकल्या-सवरलेल्या पिढीला समजेल, उमजेल अशी वेडी आशा माझी, हा चित्रपट पाहून. 

उत्तम कथा. आपल्याला आवडली बुवा. ३ नि १/२ स्टार त्याला. (४ हि चालतील. पण मी या समीक्षणातील नवखा, म्हणून १/२ स्टार आखडता हात घेऊन मागे घेतो)

जरूर पहा "ओह माय गॉड"

आपला विनम्र
-- के डी
+९१९९२०५७७८०२